एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का?;सुप्रिया सुळेंचा सवाल

Ncp-leader-mp-supriya-sule-ask-modi-government-to-hang-her-until-death-in-loksabha-news-update
Ncp-leader-mp-supriya-sule-ask-modi-government-to-hang-her-until-death-in-loksabha-news-update

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) सीबीआय (CBI), ईडी (ED), आयकर (Income Tax) या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. तसेच या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं. त्या लोकसभेत केंद्रीय तपास संस्थांच्या कारभारासह महागाईवर बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधीच कसं समजतं? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं?”

“अमित शाह खरं बोलतात, मला वाटतं त्यांनाच विचारायला हवं”

“हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरं बोला, अमित शाह खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं. सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही. अमित शाह तर नक्की खरं बोलतात,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

“मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकलं जातं. आता जेव्हा तुमचे २ कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती आहे. मी हे सिद्ध करू शकते. तुम्हाला कोणीही विचारणार नाही का? मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे.”

“…तर मला विजय चौकात फाशी द्या”

“आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा,” असं संतप्त मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here