मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA jitendra Awhad) यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्यासाठी शूटर तैनात केला आहे, अशा संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपमधील आवाज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. असे असतानाच आव्हाड यांनी एक ट्वीट करत राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
…तर धक्कादायक माहिती समोर येईल
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक फोटो पोस्ट केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महेश आहेर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच ठाणे पोलिसांनी हा शोध घेतला तर धक्कादायक माहिती समोर येईल, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
काय म्हणाले महेश आहेर?
Who is the man with Mahesh Aher .
Search his contacts and @ThaneCityPolice will be shocked
हा माणूस कोण ह्याचा शोध घ्यावा @ThaneCityPolice ह्यानी धक्कादायक माहिती बाहेर येईल pic.twitter.com/qTFIiSf2yN— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 16, 2023
“आव्हाडांना जीवे मारण्याची जी क्लिप व्हायरल झाली आहे, ती क्लिप मी ऐकलेली नाही, त्यामुळे तो आवाज कोणाचा हे मी नक्की सांगू शकत नाही. पण ५ जानेवारी २०२३ रोजी मी एका व्यक्तीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांकडे मी एक पेनड्राईव्ह सादर केला होता. ज्यामध्ये काही ऑडियो क्लिप होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने माझ्या हत्येची सुपारी घेतली असून तो जितेंद्र आव्हाडांचं नाव घेत होता. याप्रकरणी मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती”, अशी माहिती महेश आहेर यांनी दिली.
आव्हाड यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी
दरम्यान, आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्यासाठी कट रचण्यात आल्याबाबतची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. तर सध्या प्रसारित झालल्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्यात येईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे.