मुंबई l अफगाणिस्तानात Afghanistan उद्या काय व्हायचे ते होईल, पण त्यावरून कतारच्या राजधानीत होणारी रशिया Russia, चीन China, पाकिस्तान Pakistan या त्रिकुटाची बैठक भविष्यात भारतासाठी India धोक्याची घंटा ठरु शकते, अशी भीती व्यक्त करत त्रिकुटाच्या हालचालींकडेही डोळ्यात तेल घालून पाहणे आता तेवढेच आवश्यक बनले आहे, असा सल्ला सामना अग्रलेखातून Saamana Editorial केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
भारताची अमेरिकेसोबत वाढलेली सलगी, विद्यमान राज्यकर्त्यांच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबतच्या गळाभेटी रशियाच्या डोळ्यात खुपत असाव्यात. त्यामुळेच भारताच्या दोन शत्रुराष्ट्रांना सोबत घेऊन रशियाने नवी मोट बांधली आहे. रशियासारखा सच्चा दोस्त आपण का गमावला यावर तर चिंतन व्हायलाच हवे. शिवाय अफगाणच्या खुनी संघर्षात भारत भरडला जाऊ नये यासाठी नवीन त्रिकुटाच्या हालचालींकडेही डोळ्यात तेल घालून पाहणे आता तेवढेच आवश्यक बनले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
संघर्ष फक्त अफगाणिस्तानापुरता मर्यादित नाही
अफगाणिस्तानातील विद्यमान सरकार आणि तालिबान यांच्यातील रक्तरंजित संघर्ष आता टिपेला पोहचला आहे. मात्र हा संघर्ष केवळ अफगाणिस्तानपुरता मर्यादित राहिला नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे दूरगामी परिणाम होणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. खास करून हिंदुस्थानला या परिणामांचा फटका बसण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील घटना आणि त्यावरून होणाऱ्या घडामोडी याकडे हिंदुस्थानला बारकाईनेच लक्ष ठेवावे लागेल.
भारत रशियाचे जुने नाते धाब्यावर
ताजी बातमी अशी की, अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर रशिया, चीन आणि पाकिस्तान हे तीन देश एकत्र आले असून 11 ऑगस्ट रोजी कतारची राजधानी दोहा येथे या त्रिकुटाची बैठक होणार आहे. हिंदुस्थानचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियाने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात रस घेतला आहे आणि रशियाच्याच पुढाकाराने ही बैठक होते आहे. कधी काळी भारताचा जिवलग मित्र असलेल्या रशियाने मैत्रीचे हे जुने नाते धाब्यावर बसवून या बैठकीपासून भारताला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले आहे.
रशियाच्या राजकीय खेळीकडे दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही
अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्य माघारी बोलावण्यास प्रारंभ केल्यापासून रशिया अफगाणच्या अंतर्गत राजकारणात कमालीचा सक्रिय झाला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा भाग म्हणून रशियाच्या या राजकीय खेळीकडे दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही. कारण रशियाने अफगाणविषयक डावपेच आखण्यासाठी भारताचा शत्रू क्रमांक एक आणि शत्रू क्रमांक दोन अशा दोन्ही शत्रूराष्ट्रांशी हातमिळवणी केली आहे. त्यासाठीच रशियाने कतारमध्ये चीन आणि पाकिस्तानसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.
रशिया भारताच्या शत्रूंना आपल्या मांडीवर का घेतोय
जगभरातील देश हिंदुस्थानशी मैत्री करण्यासाठी कसे उतावीळ झाले आहेत याचे खूप गोडवे मागील पाच-सहा वर्षांत गायले गेले. मात्र ज्या रशियाकडून हिंदुस्थान आपली निम्म्याहून अधिक शस्त्रास्त्र खरेदी करतो तोच रशियासारखा आपला जुना मित्र आपल्या शत्रूंना मांडीवर का घेत आहे, पाकिस्तानसारख्या शत्रूबरोबर युद्धसराव का करीत आहे याचे तटस्थ विश्लेषण मात्र कोणीच करत नाही.
तालिबान्यांची राजवट प्रस्थापित करण्याची व्यूहरचना आखणं, हाच बैठकीचा उद्देश
अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करणे आणि राष्ट्रीय सहमतीची प्रक्रिया सुलभ करणे या गोंडस नावाखाली रशियाने दोहामध्ये ही बैठक आयोजित केली आहे. तथापि अमेरिकेच्या पुढाकाराने प्रस्थापित झालेले अफगाणिस्तानातील विद्यमान सरकार उलथवून लावणे आणि पुन्हा एकदा तिथे तालिबान्यांची राजवट कशी प्रस्थापित करता येईल याची व्यूहरचना आखणे हाच या बैठकीमागील मुख्य हेतू आहे.
पाकिस्तानचा घोडा हतबल, चीनकडे पाहिल्याशिवाय तो जगू शकत नाही
एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पाहूनही ही घोडागाडी धावते मात्र सरळ रेषेत. तीदेखील कारच्या वेगाने. रशियाने या तीन घोडय़ांच्या गाडीवरून बैठकीला ‘ट्रोइका मीट’ हे नाव दिले खरे, पण ट्रोइका घोडागाडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्यच रशियाचे अध्यक्ष पुतीन महाशय विसरलेले दिसतात. ते म्हणजे ट्रोइकाला जोडलेले तीनही घोडे एकाच जातीचे हवेत, अन्य दोन घोड्यांच्या तुलनेत फक्त मधला घोडाच मोठा हवा आणि तीनही घोड्यांनी एकमेकांकडे पाहू नये. खरी गडबड आहे ती इथेच. पाकिस्तानी घोडा इतका हतबल आहे की, चीनकडे पाहिल्याशिवाय तो एकही दिवस जगू शकत नाही आणि चिनी घोड्यालाही अमेरिकाच काय, रशियालाही मागे टाकून महासत्ता बनण्याचे डोहाळे लागले आहेत.
अमेरिका आणि भारताला मात व तालिबान्यांना साथ हाच रशिया पुरस्कृत बैठकीचा छुपा अजेंडा
अशा परिस्थितीत एकमेकांच्या पायात पाय घालून ही ‘ट्रोइका मीट’ होत आहे. अमेरिका आणि भारताला मात व तालिबान्यांना साथ हाच रशिया पुरस्कृत बैठकीचा छुपा अजेंडा आहे. अफगाणिस्तानात उद्या काय व्हायचे ते होईल, पण त्यावरून कतारच्या राजधानीत होणारी रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भविष्यात हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.