ओवेसींवरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह संसदेत करणार निवेदन

MIM to contest full Lok Sabha seats; mp asaduddin owaisi announced in Aurangabad
MIM to contest full Lok Sabha seats; mp asaduddin owaisi announced in Aurangabad

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देणारं भाषण करणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज राज्यसभेमध्ये ११ वाजून १० मिनिटांनी तर दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी लोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता.

या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झालाय. मात्र या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री भाष्य करणार असल्याने ते नक्की काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली असल्याने त्यावरही गृहमंत्री भाष्य करण्याची शक्यता आहे. केंद्राने दिलेली सुरक्षा नाकारताना लोकसभेत याविषयी ओवैसी यांनी भाष्य केलेलं.

“माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी आणि या देशातील कट्टरतावादाचा अंत करावा,’ असं ओवैसी म्हणाले होते.

मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’नुसार का कारवाई करत नाहीत, असे ओवैसी यांनी सांगितले होते.

‘उत्तर प्रदेश सरकारने याप्रकरणी हल्लेखोरांना अटक केली असून त्यांच्याजवळील शस्त्रे आणि वाहन जप्त केले आहे,’ असे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. गृहमंत्री अमित शाह हे सोमवारी याप्रकरणी लोकसभेत बोलणार असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here