नवी दिल्ली l देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N V Ramana) यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट) देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत (Justice UU Lalit) यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः गुरुवारी (४ ऑगस्ट) केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली.
केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून ३ ऑगस्टला सरन्यायाधीशांच्या सचिवालयाला सरन्यायाधीशपदासाठी पुढील उत्तराधिकारी निवडण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता. यानंतर प्रथेप्रमाणे सरन्यायाधीश रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस केली.
एन. व्ही. रमणा २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. तेही ८ नोव्हेंबरला निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील.
न्यायमूर्ती उदय लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपूत्र?
न्यायमूर्ती उदय लळीत हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत. देवगड तालुक्यातील कोठारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. लळीत यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील आपटे गावात स्थलांतरीत झाल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर लळीत कुटुंब कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. विशेष म्हणजे लळीत कुटुंबात पिढ्यान पिठ्या वकिलीचा व्यवसाय केला जातो.
आगामी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या कुटुंबात वडिलांपासून अगदी आजोबांपर्यंत अनेकांनी वकिली केली आहे. पुढे उदय लळीत यांनीही तोच व्यवसाय निवडला. मुंबईत वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. डिसेंबर १९८५ पर्यंत लळीत यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये ते दिल्लीत स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.
एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकिलीचा दर्जा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी मध्यस्थ निरिक्षक (‘एमिकस क्युरी’) म्हणून काम केलं. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. यानंतर १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. आता देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस झाली आहे.