अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, तुम्हालाही त्याच कबरीत….

bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today
bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today

मुंबई: एमआयएम (AIMIM) पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, वारीस पठाण यांची उपस्थिती होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेलं आव्हान असून आपण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका असा इशारा दिला आहे.

औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण कऱण्याचं ओवेसी बंधूंचं राजकारण दिसत आहे. पण मी इतकंच सांगेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 “औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी त्याच्यासोबत लढाई लढली आहे. पण आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

 संजय राऊतांनी यावेळी काश्मिरी पंडिताच्या हत्येच्या मुद्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “काश्मीर खोऱ्यात सातत्याने काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. काल एका तरुण सरकारी कर्मचारी, काश्मिरी पंडित आपल्या कार्यालयात काम करत असताना हत्या झाली. हे वारंवार होऊ लागलं आहे. काश्मीरमधील स्थिती पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. केंद्र सरकार आणि खासकरुन नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. काही काळ राजकारण दूर ठेवलं पाहिजे”.

पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही…

“काश्मिरी पंडितांची घऱवापसी हा भाजपाचा आणि मोदी सरकारचा मुख्य अजेंडा होता. त्यासाठी कलम ३७० हटवण्यात आलं. आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तरीही काश्मिरी पंडितांची घरवापसी झालेली नाही. आजही काश्मीर शांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत. फक्त काश्मिरी पंडित नाही तर तेथील सामान्य जनतेचं जीवनही असुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही तुम्ही काय कठोर पावलं उचलता हे पहावं लागेल,” असं राऊत म्हणाले.

दुसरीकडे काश्मीर अशांत…

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “काश्मिरी पंडितांचे प्रश्न हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उचलून तुम्ही विचलित करु शकत नाही. देशाचं याकडे बारीक लक्ष आहे. शिवसेना याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे. जे शक्य असेल ते आम्ही करु. पण सरकार काय करत आहे? सरकारला इतर विषय बाजूला ठेवून काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेकडे पहावं लागेल. एका बाजूला चीन घुसलं आहे आणि दुसरीकडे काश्मीर अशांत आहे हे देशाला परवडणार नाही”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here