Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री!

जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष अमिन भट (Amin Bhatt) यांनी, “गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील” असं विधान केलं आहे.

ghulam-nabi-azad-will-be-the-jammu-and-kashmir-cm-says-former-congress-mla-Amin Bhatt-news-update-today
ghulam-nabi-azad-will-be-the-jammu-and-kashmir-cm-says-former-congress-mla-Amin Bhatt-news-update-today

नवी दिल्ली: काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी शुक्रवारी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. आझाद यांनी गांधी कुटुंबावर थेट प्रहार केल्यामुळे सामंजस्याची शक्यता संपुष्टात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष अमिन भट ((Amin Bhatt) यांनी, “गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील” असं विधान केलं आहे.

माजी आमदार असलेल्या अमिन यांनी आज सकाळीच आझाद यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमिन यांनी आझाद यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली. आझाद हे नवीन पक्ष स्थापन करणार असून ते भाजपासोबत युती करुन पुढील विधानसभा निवडणूक लढवतील असा एक अंदाज व्यक्त केला जात असतानाच अमिन यांनी आझाद आणि त्यांचे समर्थक हे भाजपाची टीम बी नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. “आम्ही पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा चर्चा केली. आम्ही भाजपाची बी टीम नाही,” असं अमिन यांनी म्हटलं आहे.

‘‘रिमोट कंट्रोल पद्धतीने यूपीए सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली होती, आता काँग्रेसमध्येच हा प्रयोग केला जात आहे. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत,’’ अशी कठोर टीका आझाद यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पाच पानी राजीनामापत्रात केली आहे. राहुल गांधी अधिकृत पक्षाध्यक्ष नसले तरी, त्यांच्या संमतीशिवाय पक्षात कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेते सातत्याने करत आहेत.

संघटनात्मक बदल करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी ‘जी-२३’ गटाने केली होती. सोनिया गांधी यांना ऑगस्ट २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रानंतर बंडखोर गटाचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. या गटाचे म्होरके असलेले आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here