मुंबई : महागाईमुळे जनता होरपळ असताना ऐन सणासुदीच्या काळात आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट देण्याची घोषणा केली आहे. सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया (BOI) ने आपल्या गृह कर्जावरील व्याजदर 0.35 टक्क्यांनी कमी केलाय. याशिवाय बँकेने वाहन कर्जावरील व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी केलेत.
बीओआयचा गृहकर्ज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू
बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, या कपातीनंतर बीओआयचा गृहकर्ज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू होईल. पूर्वी ते 6.85 टक्के होते. त्याचबरोबर बँकेच्या वाहन कर्जावरील व्याजदर 7.35 वरून 6.85 टक्क्यांवर आलाय.
स्टार होम लोनवर BOI @ 6.5% आणि स्टार व्हेईकल लोन @ 6.85%
बँक ऑफ इंडियाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता आनंद दुप्पट होणार आहे. आता बँक ऑफ इंडियासोबत आनंदाचा सण साजरा करा. शून्य प्रक्रिया शुल्कासह BOI स्टार होम लोन @ 6.5% आणि स्टार व्हेईकल लोन @ 6.85% मिळवा. 8010968305 वर मिस्ड कॉल द्या. गृह कर्जासाठी HL टाईप करा आणि 7669300024 या क्रमांकावर SMS पाठवा. वाहन कर्जासाठी VL टाईप करा आणि 7669300024 या क्रमांकावर SMS पाठवा. बँकेने सांगितले की, हा विशेष दर 18 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू असेल. नवीन कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आणि कर्जाचे हस्तांतरण करण्यासाठी नवीन व्याजदर लागू होणार आहे. यासह बँकेने 31 डिसेंबर 2021 पर्यंत गृह आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केलेय.
आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेवीवर चांगले व्याज
यापूर्वी भारतीय स्टेट बँक (SBI), HDFC बँक आणि आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेवीवर चांगले व्याज मिळत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये या बँकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदर घटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनी आपला मोर्चा स्मॉल फायनान्स बँकाकडे वळवला आहे. या बँकांकडून मुदत ठेवीसाठी 6.75 ते 7 टक्क्यांच्या घरात व्याज दिले जात आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक सध्या एकमेव बँक आहे, जी सामान्य जनतेला 1 वर्षांच्या ठेवींवर 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 6.75 टक्के आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना 6.00 टक्के व्याज दर देणाऱ्या बँकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ती 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 6.50 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहे. ही व्याज दर रक्कम 1 वर्षापासून 2 वर्षांपर्यंतच्या FD योजनेसाठी आहे. म्हणजेच, सामान्य नागरिक 6 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक 6.50 टक्क्यांपर्यंत कमावू शकतात.
इंडसइंड बँक
खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेली इंडसइंड बँक सध्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 6 टक्के आणि 6.50 टक्के व्याज देत आहे. एक वर्षाच्या मुदत ठेवीसाठी हे व्याजदर लागू आहेत. 1 वर्ष आणि 6 महिन्यांपेक्षा कमी FD वर समान व्याज दर दिला जात आहे.
आरबीएल बँक
RBL बँक ही खाजगी क्षेत्रातील बँक आहे जी FD घेणाऱ्यांसाठी आकर्षक ऑफर चालवत आहे. सामान्य लोकांना 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 6.00 टक्के व्याज दर देणारी ही खाजगी क्षेत्रातील दुसरी बँक आहे. 12 महिने ते 24 महिन्यांच्या मुदत ठेवीसाठी 6 टक्के व्याजदर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 6.50 टक्के आहे.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना ‘या’ गोष्टी नक्की ध्यानात ठेवा
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना व्याजदर हाच एकमेव निकष ठेवू नका. जास्त व्याजाच्या हव्यासापोटी णतीही पतपेढी किंवा लहानसहान बँकेत पैसे गुंतवू नका. त्यासाठी चांगले रेटिंग असलेल्या पतपेढी आणि बँकांची निवड करा. मुदत ठेव योजनांमध्ये पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे हे आपल्या गरजेनुसार आणि सोईनुसार ठरवा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि पुढील पाच-दहा वर्षे या पैशांची फारशी गरज लागणार नाही, असे वाटत असल्यास पैसे FD मध्ये गुंतवा. एक किंवा दोन वर्षांच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास FD वर जास्त व्याज मिळते.