मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून डिवचले आहे. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे.
भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश असून त्यातून भाजपचा चेहराच दुटप्पी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.राष्ट्रवादीने एक मिनिटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच व्हिडीओवर पाच कावळ्यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
या व्हिडीओच्या सुरुवातीला पंतप्रधानांचं संसदेतील आजचं 13 सेंकदाचं भाषण दाखवण्यात आलं आहे. देशात आंदोलनजीवी नावाची नवी जमात आल्याचं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आजवर घेतलेल्या आंदोलनाचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बाईट्सही दाखवण्यात आले असून त्यात ते राज्य सरकारला आंदोलन करण्याचा इशारा देत असताना दाखवलं आहे. हे फोटो आणि बाईट्स दाखवताना फोटो, बाईट्स संपताच पार्श्वभागाला मोदींचा आंदोलनजीवी हा शब्द ऐकायला येतो. त्यानंतर खवचट हसण्याचा आवाज येत असून या व्हिडीओतून राष्ट्रवादीने भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे.
या व्हिडिओमधून हल्ला
ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात@PMOIndia @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @KiritSomaiya @smritiirani #आंदोलनजीवी #RajyaSabha #BudgetSession pic.twitter.com/RleOZuWhzT
— NCP (@NCPspeaks) February 8, 2021
वीज कनेक्शन तोडू नये म्हणून भाजपच्या महिला आघाडीने केलेलं आंदोलन, वीज कार्यालयाला भाजपने केलेलं टाळे ठोको आंदोलन, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन, केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केलेलं गॅस सिलिंडर दरवाढीविरोधातील आंदोलन आदींचे फोटो या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत.
यामध्ये फडणवीसांचं बाईट आहे. जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा देताना ते दिसत आहे. तर भाजपचं आंदोलन हे जनआंदोलन कधी झालं हे कळणारच नाही, असं चंद्रकांत पाटील सांगताना दिसत आहेत. त्याशिवाय आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत, असं सोमय्या सांगत असल्याचंही या व्हिडीओत ऐकायला मिळत आहे.
मोदी म्हणाले, आंदोलनजीवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत.
देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशा शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता.
हेही वाचा
शेतकरी आंदोलन: ट्विटसाठी सेलिब्रिटींवर मोदी सरकारकडून दबाव?; अनिल देशमुखांचे चौकशीचे आदेश
देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली : शिवसेना
उत्तराखंड आपदा: टनल में फंसे 30 लोगों का रेस्क्यू,14 शव मिले, 170 मौतों की आशंका