मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या तपासामध्ये दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे जुने व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहेत. यात रियाने ड्रग्जच्या कथित वापराबद्दल बातचीत केल्याचे दिसून येत आहे. (Rhea Chakraborty Whatsapp Chats allegedly shows her Conversation with Drug Dealers)
रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे दिसते. जया सहा नावाच्या व्यक्तीने रियाला ‘चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे, किक बसायला 30-40 मिनिटे दे’ असे मेसेज केले आहेत. रिया आणि जया साहा नावाच्या व्यक्ती तिने चॅट केली होती. 25 नोव्हेंबर, 2019 रोजी जयाने रियाला “मी तिला श्रुतीशी समन्वय करण्यास सांगितले” असे म्हटले होते.
रिया चक्रवर्ती 8 मार्च 2017 रोजी ही एका कथित चॅटमध्ये गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी बोलत आहे. ती म्हणते, “ मी हार्ड ड्रग्ज जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला, या मेसेजनंतर “आपल्याकडे एमडी आहे का?” अशी विचारणा रियाने केली आहे.
रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिले आहे. मृत्यू प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) या प्रकरणात चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे या संपूर्ण तपासाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.