नवी दिल्ली: ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बेंगळुरू येथून अटक करण्यात आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी Disha-ravi हिला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर Shashi-tharoor यांनी दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. “कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत, तर दहशतवादी जामिनावर बाहेर”Activist-in-jail-terrorist-on-bail अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
रविवारी पतियाळा हाऊस कोर्टात तिला हजर केले असता कोर्टाने ५ दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, दिशाच्या अटकेवरुन राजकारण तापायला सुरूवात झाली असून तिच्या अटकेचा विरोध होत आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिशाच्या त्वरित सुटकेची मागणी केली आहे.
Activists in jail while accused terrorists are on bail. Wondering how our authorities would commemorate this case on the anniversary of Pulwama Attacks? You have the answer in this pair of headlines. pic.twitter.com/lkft38pNBj
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 14, 2021
शशी थरूर यांनी जम्मू-काश्मिरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबतच दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
देविंदर सिंह सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे दोन फोटो शेअर करताना, “कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत, तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर….आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?… उत्तर खालच्या दोन शिर्षकांमध्ये मिळेल…असं ट्विट करत थरुर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’च्या अधिकाऱ्यांनी दिशा रवी हिला तिच्या घरातून प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ तयार करण्यात आणि ते प्रसारित करण्यात तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.
दिशा रवी हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. दिशाचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यातून ‘टूलकिट’ प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि दिशा कोणाच्या संपर्कात होती याची माहिती मिळू शकेल, असा पोलिसांचा कयास आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी मोर्चाच्या वेळी स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने कथित ‘टूलकिट’ आपल्या ट्विटर खात्यावर प्रसारित केले होते. परंतु नंतर तिने ते काढून टाकले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’चे संपादन दिशा हिने केले होते. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात तिचा मोठा वाटा होता. ‘टूलकिट’बाबतचे हे प्रकरण गुन्हेगारी कटाचा भाग मानले जात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गूगलच्या मदतीने ‘गुगल टूलकिट’ टाकणाऱ्यांचा ‘आयपी’ पत्ता शोधला होता. त्यातून दिशाचा थांग लावण्यात आला.
स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाचे कथित ‘टूलकिट’ ट्विटरवर प्रसारित केले होते. त्यानंतर तिने शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले होते. दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने ४ फेब्रुवारीला ‘टूलकिट’निर्मात्या अनोळखी कथित खलिस्तान समर्थकांविरोधात भारत सरकारविरुद्ध सामाजिक, सास्कृतिक आणि आर्थिक युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हेगारी कट, देशद्रोह यांसह अनेक कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ग्रेटा थनबर्ग, प्रख्यात पॉप गायिका रिहाना यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय वलयांकित व्यक्तींनी समाजमाध्यमांद्वारे या आंदोलनाकडे लक्ष वेधले होते, तर काहींनी पाठिंबा दिला होता.
[…] […]