नवी दिल्ली: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) याला आज पुन्हा एकदा जामीन नकारण्यात आला. सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आचार्य प्रमोद (Acharya Pramod) यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी या प्रकरणासंदर्भात एक ट्विट केलं आहे. शाहरुखने भाजपामध्ये प्रवेश केल्यास मुलगा आर्यनला जामीन मिळण्याबरोबरच देशभक्त असल्याचं प्रमाणपत्रही शाहरुखला मिळेल असं आचार्य प्रमोद यांनी म्हटलंय.
आर्यन हा ३ ऑक्टोबरपासून तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र आर्यनला जामीन नाकारण्याच्या आधापासूनच म्हणजेच आज सकाळपासूनच या प्रकरणाची सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु होती. त्यातच एका अध्यात्मिक गुरुंनी आर्यनला तुरुंगामधून सोडवण्यासाठी सल्ला देताना यंत्रणांच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय.
शाहरुख़ खान को BJP ज्वाइन कर लेनी चाहिये, बेटे की “बेल” के साथ साथ “देश भक्ति”
का “सर्टिफ़िकेट” भी मिल जायेगा. @iamsrk #AryanKhanBail— Acharya Pramod (@AcharyaPramodk) October 20, 2021
आचार्य प्रमोद यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन एक ट्विट केलं आहे. शाहरुखने भाजपामध्ये प्रवेश केल्यास मुलगा आर्यनला जामीन मिळण्याबरोबरच देशभक्त असल्याचं प्रमाणपत्रही शाहरुखला मिळेल असं आचार्य प्रमोद यांनी म्हटलंय.
“शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश घेतला पाहिजे. मुलाला जामीन मिळण्याबरोबरच त्याला देशभक्तीचं प्रमाणपत्रही मिळेल,” असं ट्विट त्यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी शाहरुखला टॅगही केलं आहे. तसेच #AryanKhanBail हा हॅशटॅगही वापरलाय.
शिल्पा शेट्टी और राज कुन्दरा बाबा रामदेव के शिष्य हैं,ध्यान,योग,साधना उन्होंने ही सिखायी है, फिर भी “ध्यान” भटक गया.
— Acharya Pramod (@AcharyaPramodk) July 19, 2021
आचार्य प्रमोद यांनी अशाप्रकारे सेलिब्रिटींसंदर्भात भाष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १९ जुलै रोजी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यवसायिक राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आचार्य प्रमोद यांनी, “शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा बाबा रामदेव यांचे शिष्य आहेत. ध्यान, योग, साधना त्यांना (शिल्पा आणि राज यांना) त्यांनीच (बाबा रामदेव) शिकवली आहे. तरीही त्याचं धान्य (लक्ष्य) विचलित झालं,” असं ट्विट केलं होतं.
शाहरुखने भाजपामध्ये प्रवेश घ्यावा असा सल्ला देणारं आचार्य प्रमोद यांचं ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. काही तासांमध्ये १५०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलंय. तर ९ हजार ६०० हून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे.