Anil Deshmukh Bail : तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

anil-deshmukh-first-reaction-after-coming-out-jail-in-ed-and-cbi-money-laundering-case-news-update
anil-deshmukh-first-reaction-after-coming-out-jail-in-ed-and-cbi-money-laundering-case-news-update

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Granted Bail) तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (२८ डिसेंबर) तुरुंगाबाहेर माध्यमांशी बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”

“परमबीर सिंहांचा निकटवर्ती सचिन वझेला दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये अटक”

“उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.

“मुंबईतील उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी सचिन वझेला अटक”

“मुंबईतील उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वझेला अटक झाली आहे. तीनवेळा त्याला निलंबित करण्यात आलं आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं. तसेच माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचंही म्हटलं,” असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.

अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?
अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

 दरम्यान, सुरुवातीला हा गैरव्यवहाराचा आकडा १०० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पुढे हा आकडा कमी कमी होत गेला. “अनिल देशमुख यांनी सचिन वझेमार्फत मुंबईतील बार मालकांकडून ४ कोटी ७० लाख रुपये खंडणी वसूल केली. यानंतर हे पैसे बेकायदेशीर मार्गाने नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थेत पाठवले. या शिक्षण संस्थेवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांचं नियंत्रण आहे,” असा आरोप ईडीने अनिल देशमुखांवर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here