“बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Ex-cm-shivsena-uddhav-thackeray-says-amoeba-named-nda-is-still-alive-after-many-years-narendra-modi-news-update-today
Ex-cm-shivsena-uddhav-thackeray-says-amoeba-named-nda-is-still-alive-after-many-years-narendra-modi-news-update-today

मुंबई : देशातील सर्वच पक्ष, युत्या, आघाड्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करू लागले आहेत. विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. एनडीएविरुद्ध विरोधी पक्षांनी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात २३ जून रोजी बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. या बैठकीला देशातले १६ पक्ष एकत्र आले होते. त्यापाठोपाठ या महिन्यात १७ आणि १८ जुलै रोजी कर्नाटकच्या बंगळुरू येथे विरोधी पक्षांची दुसरी बैठक पार पडली. यावेळी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रमुख शरद पवार या बैठकीला उपस्थित होते.

विरोधी पक्षांची वाढू लागलेली ताकद पाहता दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील एनडीएची (भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी) तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला ३६ पक्ष उपस्थित होते. या एनडीएच्या बैठकीवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एक मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे पाहायला मिळालं.

एनडीएच्या बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ (INDIA) नावाची एक आघाडी झाली आहे, या आघाडीला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी (विरोधकांच्या बैठकीच्या दिवशी) आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या, ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या आणि ३६ पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली.

 उद्धव ठाकरे म्हणाले, खरंतर ३६ पक्षांची त्यांना गरज नाहीये. त्यांच्या ‘एनडीए’मध्ये आता ईडी (अंमलबजावणी संचालनालय), इन्कम टॅक्स (आयकर विभाग) आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. बाकी पक्ष राहिलेत कुठे. एनडीएतल्या काही पक्षांचा तर एकही खासदार नाहीये. खरी शिवसेना तर ‘एनडीए’त नाहीच आहे. सगळे गद्दार तिकडे गेले आहेत. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष आता ‘एनडीए’त आता शिल्लक राहिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here