कोल्हापूर दंगलीप्रकरणी पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल करा: डॉ. राजू वाघमारे

Investigate senior police officers including Superintendent of Police in case of Kolhapur riots and file a case: Dr. Raju Waghmare
Investigate senior police officers including Superintendent of Police in case of Kolhapur riots and file a case: Dr. Raju Waghmare

मुंबई: राज्यात मागील ७६ दिवसांत १० ठिकाणी दंगली झाल्या त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या आहेत. भाजपाचा जनाधार घटत असल्याने धार्मिक दंगे घडवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. कोल्हापूरात व्हॉटसअपवर मेसेज फिरत असतानाही स्थानिक पोलिसांनी त्याची वेळीच दखल घेतली नाही, त्यामुळे ही दंगल घडली. या प्रकरणी कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. राजू वाघमारे म्हणाले की, राज्यात द्वषेपूर्ण भाषणे देऊन वातावरण बिघडवण्याचे काम काही संघटना करत आहेत पण ही द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांना भाजपा सरकारने कधीच रोखले नाही. शिवाजी चौकात जमा व्हा, रॅली काढायची आहे. असे मेसेज व्हॉटसअपवर येत आहेत हे पोलिसांना माहित होते पण पोलीसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मेसेज फिरत असताना पोलिसांनी खबरदारी का  घेतली नाही? पोलीसांनी अधिकची कुमक का पाठवली नाही? कोल्हापूरात पोलीस फिरतही नव्हते. कोणत्या वरिष्ठांच्या आदेशाची पोलीस वाट पहात होते? हे सर्व उघड झाले पाहिजे त्यासाठी कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

राज्यात जेव्हा जेव्हा दंगली झाल्या त्यावेळस तथाकथित हिंदू संघटना रस्त्यावर आल्या व गोंधळ झाला असे सांगितले जाते. या संघटना कोणत्या? त्यांचे म्होरके कोण आहेत? याची माहिती मिळाली पाहिजे. परंतु तथाकथित हिंदू संघटनांच्या नावाखाली भाजपा कार्यकर्तेच रस्त्यावर उतरुन दंगली घडवतात आणि हिंदू संघटनांना बदनाम करतात असे चित्र आहे. राज्यातील दंगलीमागे भाजपाचाच हात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नाही. फडणवीस यांच्याकडे कुवत नसताना वित्त, उर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार गृहमंत्री व सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे, त्यामुळे ते गृहविभागाला वेळ देऊ शकत नाहीत.

माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर काही लोक नाहक टीका करत आहेत वास्तविक सतेज पाटील यांनी विशालगडावर काय घडत आहे, कोल्हापूरात सोशल मीडीयावर कोणते संदेश फिरत आहेत, यावर भाष्य केले होते. वातावरणाची कल्पना त्यांनी करुन दिली होती. सरकारला जागरुक करण्याचे काम माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले तरिही वेगवान सरकार म्हणवणारे झोपी गेले होते. सरकारने वेळीच दखल घेतली नाही म्हणूनच कोल्हापूरात दंगल घडली.

भाजपा देशभर पराभूत होत असल्याचे सर्वे येत असल्याने भाजपा बिथरला आहे. हिमाचल व कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रातही पराभवाची भिती वाटत असल्याने दंगलीचा फायदा उठवून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. कोल्हापूरात औरंगजेबाचे फोटो दाखवून २४ मार्चला दंगल झाली, संभाजीनगरला रामनवनी दिवशी १६ मार्चला दंगल, ३१ मार्चला अमरावतीत, १३ मे रोजी अकोल्यात, १ मे रोजी शेगावमध्ये, १४ मे रोजी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण, ६ जून रोजी संगमेनरमध्ये लव्ह जिहाद प्रकरण आणि आता ७ जून रोजी कोल्हापूरमध्ये पुन्हा औरंगजेब फोटोवरून दंगल घडवण्यात आली.

ज्या जिल्ह्यात भाजपाच्या जागा नाहीत अथवा कमी आहेत त्या जिल्ह्यात दंगली घडवल्या जात आहेत. कोल्हापूरमध्ये १० विधानसभा जागा असून मागील निवडणुकीत भाजपाला एकही जागा मिळाली नाही, २०१४ ला २ जागा होत्या. नाशिकमध्ये १५ पैकी ५ जागा भाजपाकडे आहेत. संभाजीनगरमध्ये ९ पैकी ३ भाजपाकडे आहेत, अहमदनगरमध्ये १२ जागा आहेत त्यातील ३ जागा भाजपाकडे आहेत. शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्या जागांवर भाजपाचा डोळा असून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हे सर्व घडवले जात आहे, असा आरोप डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here