मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Raj Thackeray) यांनी सार्वजनिक ठिकाणी नियम मोडल्याने त्यांना दंड भरावा लागला आहे. शुक्रवारी मुंबई ते मांडवा या रो-रो फेरीने राज ठाकरे अलिबाग या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांनी रो-रो बोटीवर मास्क न लावला प्रवास करत होते. तसेच धूम्रपानही करत होते. त्यामुळे त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.(raj-thackeray-broke-the-rules-in-public-place-and-had-to-pay-a-fine)
रो-रो बोटीच्या मोकळ्या भागात उभं राहून राज ठाकरे मास्क न घालता सिगरेट ओढत होते. राज ठाकरे हे सिगारेट पित असल्याचे आणि त्यांनी मास्क न घातल्याचे बोटीवरच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडे ते गेले. त्यांना बोटीच्या नियमांबाबत सांगितले. राज ठाकरेंना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि १ हजार रुपये दंडही भरला. विशेष म्हणजे रो-रो बोटीत प्रवाशांनी धूम्रपान करु नये आणि मास्क परिधान करावा अशा उद्घोषणा देण्यात येत होत्या. तरीही राज ठाकरे यांनी हे नियम पाळले नाहीत.
राज ठाकरे म्हणाले होते माझा मास्क लावण्यावर विश्वास नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी सर्व पक्षीय नेत्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. या पक्षाला सर्व पक्षीय नेते हजर होते. या बैठकीला राज ठाकरेंचीही उपस्थिती होती. या बैठकीतही राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मास्क लावून आले होते. सोबत असलेले सर्व सुरक्षा रक्षक कर्मचा-यांनाही मास्क लावलेला होता. त्याबाबत माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. दरम्यान आपला मास्क लावण्यावर विश्वास नाही, असंही राज ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. हे विशेष.