मुंबई: निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट या वादासाठी कारणीभूत ठरला आहे. ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे सध्या चांगलीच चर्चा सुरु असून यावरुन विरोध दर्शवला जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) याप्रकरणी महेश मांजरेकांकडे याप्रकरणी खुलासा मागितला आहे.
महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दोन मित्रांवर आधारित असलेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलं असल्याने अनेक पालकांना यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून पत्र पाठवत खुलासा मागवण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला 1/2 pic.twitter.com/RqZEfKvAAM
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 13, 2022
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या आहेत –
“महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना,कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगानेही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे.