मुंबई: मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना प्रमुख ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज्य करताना कोणत्या समस्या आहेत, हा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आजारी पडल्याचं सांगितलं. माझ्या मणक्याचं ऑपरेशन झालं आणि शरीर सुन्न पडलं, असं बोलले. मात्र, कोरोनाच्या काळात हे आपल्या करीनाबरोबर घरात बसले होते, अशी घणाघाती टीका प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
प्रकाश महाजनांच्या विधानावर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “एवढ्या घाणेरड्या शब्दांत महाजन कुटुंबातील एक व्यक्ती बोलत आहे, हे चांगलं नाही. तुमच्या भावावर गोळीबार कशामुळे झाला, हे आमच्यासारख्यांनी सांगण्याची गरज नाही. पहिलं तुमचं घर संभाळा,” असा सल्ला किशोरी पेडणेकरांनी प्रकाश महाजनांना दिला आहे.
“…याला काहीच धाक नाही”
आदित्य ठाकरेंवर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, “आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत बोलताना सांगतात ३२ वर्षाच्या नेत्याला सर्वजण घाबरले. तू ३२ वर्षांचा झाला असल्यास तुझ्या आई-वडिलांना लग्न लावून द्यायला सांग. लग्न लावले नसल्याने माणसाची गडबड होते. आमचं लग्न झाल्याने आम्हाला घरचा धाक असतो. पण, याला काहीच धाक नाही,” असं प्रकाश महाजनांनी म्हटलं आहे.