Andheri East Bypoll : शिंदे गट अंधेरी पोटनिवडणूक लढणार नाही, ऋतुजा लटकेंविरोधात भाजपाचे मुरजी पटेल मैदानात

shivsena-uddhav-thackeray-on-andheri-by-poll-election-result-rutuja-latke-win-bjp-news-update-today
shivsena-uddhav-thackeray-on-andheri-by-poll-election-result-rutuja-latke-win-bjp-news-update-today

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे ऋतुजा लटके (Rutuja Latke) आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाने महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) ही निवडणूक लढणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना मुरजी पटेल यांनी आपण महायुतीचे उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी आज अर्ज भरण्यासाठी चाललो आहे. अंधेरी आमचा एक परिवार आहे, येथे सर्वधर्मीय लोक राहतात. अंधेरीची जनता आम्हाला पूर्ण बहुमताने निवडून देईल,” असा विश्वास मुरजी पटेल यांनी व्यक्त केला आहे.

 “मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. पक्षाने मला निवडणूक लढवण्यास सांगितल्याने मी मैदानात उतरलो आहे. आमच्याबरोबर खऱी शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत. रामदास आठवले यांचा आरपीआय गटही आमच्यासोबत आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणुकिच्या रिंगणात उतरणार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं.

 “गेल्या २०-२२ वर्षांपासून अंधेरी पूर्व परिवाराची मी सेवा करत आहे. विकास झाला पाहिजे असं लोकांना वाटत आहे. आमच्याकडे एकही सरकारी रुग्णालयात नाही. नेहमी होणारी वाहतूक कोंडी आम्ही सोडवणार आहोत. अंधेरी हे औद्योगिक केंद्र आहे. अंधेरीतून सर्वात जास्त कर जातो. अंधेरीतील तरुणांना आम्ही रोजगार देणार आहोत. आमचे प्रत्येकाशी संबंध आहेत. अंधेरीत इतिहास घडणार हे नक्की,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंधेरी निवडणूक भाजपा लढणारी की शिंदे गट याबाबत संभ्रम होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती होती. पण आता मुरजी पटेल हेच निवडणूक लढणार असल्याचं नक्की झालं आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here