मुंबई:‘बचपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला सहदेव दिरदोचा (Shahdev dirdo) भीषण अपघातात जखमी झाला आहे. ही घटना शबरी नगरमध्ये घडली असून, सहदेवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहदेव दिरदो हा छत्तीसगडचा रहिवासी असून त्याच्या अपघाताची बातमी समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, रॅपर बादशाहनेही (Badshah) सहदेवसाठी एक ट्विट केले आहे. रॅपर बादशाहसोबत सहदेव दिरदोने ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले आहे.
ट्विटमध्ये बादशाहने माहिती दिली आहे की तो सतत सहदेवच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. ‘मी सहदेव यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात आहे. तो बेशुद्ध आहे. रुग्णालयात नेले जात आहे. मी त्याच्यासाठी तिथे आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, असे बादशाहने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बादशाहच्या या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट करून सहदेवच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
In touch with Sahdev’s family and friends. He is unconscious, on his way to hospital. Im there for him. Need your prayers 🙏
— BADSHAH (@Its_Badshah) December 28, 2021
सहदेव दिरदो मंगळवारी आपल्या मित्रांसोबत प्रवासादरम्यान अपघातात गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करत असताना हा अपघात झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. शबरी नगरीकडे जाताना त्याची गाडी घसरली आणि हा अपघात घडला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
२०१९ मध्ये सहदेवचे ‘बचपन का प्यार’ हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यातून सहदेवला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली होती. सहदेवच्या या गाण्यावर लोकांनी सोशल मीडियावर खूप रिल्स काढायला सुरुवात केली. यानंतर रॅपर बादशाहने त्याच्यासोबत काम करण्याचे ठरवले. बादशाह आणि सहदेवची जोडी लोकांना खूप आवडली.
पाचवीच्या वर्गात शिकत असतांना सहदेवने ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. जेव्हा तो इयत्ता आठवीत आला तेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओ बादशहापर्यंत पोहोचला तेव्हा त्याने व्हिडिओ कॉलद्वारे सहदेवीशी चर्चा केली. आपण आता एकत्र गाऊ या, असे बादशहाने सहदेवला सांगितले. यानंतर या दोघांनीही एकत्र गाणे रेकॉर्ड केले होते.