मुंबई : देशभरातील २२५ सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींनी भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व संघटनांचे प्रतिनिधी शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला यांच्यासह मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सर्वांच्या सहभागामुळे भारत जोडो यात्रा हे एक जनआंदोलन झाले असून आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
मुंबईच्या इस्लाम जिमखान्यात सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली या बैठकीला थोर स्वातंत्र्य सेनानी बी. जी. पारीख, योगेंद्र यादव, मेधा पाटकर, तुषार गांधी, प्रतिभा शिंदे, सुभाष वारे, वर्षा देशपांडे, सुशिलाताई मोराळे, फिरोज मिठीबोरवाला, ललित बाबर, संदेश भंडारे, उल्का महाजन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रकाश सोनावणे यांच्यासह विविध सामाजिक संघटना व सिव्हिल सोसाटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून देशातील लोकशाही आणि संविधान तर संकटात आले आहेच. या सोबतच देशातील सामाजिक एकोपा आणि बंधुभाव संपवून जाणिवपूर्वक द्वेषाचे वातावरण तयार झाले. महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली असून सर्वच स्तरातील नागरिक या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी होत आहेत त्यामुळे ही यात्रा आता जनआंदोलन झाली आहे. लोकशाही आणि संविधानाला मानणा-या सामाजिक न्यायाच्या बाजूच्या सर्व लोकांनी यात्रेत सहभागी व्हावे असे नाना पटोले म्हणाले.
यावेळी बोलताना सिव्हिल सोसायटींचे प्रतिनिधी म्हणाले की, काँग्रेस सरकार सर्वांना सोबत घेऊन चालत होते. देशात बंधुभावाचे वातावरण होते. सिव्हिल सोसायटी, सामाजिक संघटनांशी संवाद साधला जात होता. कायदे, विविध कल्याणकारी योजना तयार करताना सर्वंकष चर्चा केली जात होती. पण आठ वर्षापूर्वी भाजपचे सरकार आल्यापासून संविधान, लोकशाही, सामाजिक संघटना, सिव्हिल सोसायटी, साहित्यिक, कलाकार अशा सर्वच घटकांचा आवाज दाबला जातोय. याविरोधात राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा हा या हुकुमशाही विरोधातील निर्णायक लढा आहे. आम्ही सर्व जण यात आमच्या सहका-यांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊ असे सर्व प्रतिनिधी म्हणाले.