National Consumer Day: ग्राहकांच्या हक्कासाठी कायद्याचे कवच!

ग्राहक संरक्षण कायदा ,1986 अस्तित्वात आला.  २४ डिसेंबर १९८६ साली या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या मा.राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन National Consumer Day म्हणून साजरा केला जातो.   

consumers-to-be-educated-about-their-rights-on-national-consumer-day-update
consumers-to-be-educated-about-their-rights-on-national-consumer-day-update

गेल्या दोन-तीन दशकामध्ये ग्राहकांची मनोवृत्ती आणि वागणूक यामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. ग्राहकांची खरेदी करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ झालेली असून, दैनंदिन  गरजा आवश्यक वस्तुंकरिता देखील अधिक पैसे मोजण्याची मानसिकता ग्राहकाने स्वीकारली आहे.  बाजारातल्या  वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक संरक्षण कायदा ,1986 अस्तित्वात आला.  २४ डिसेंबर १९८६ साली या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या मा.राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन National Consumer Day म्हणून साजरा केला जातो.   

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळाला.

 या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. ग्राहकांच्या विवादामध्ये लवकर व सहजपणे तडजोड घडवून आणण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अर्ध न्यायिकयंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे अनुचित व्यापारी प्रथा आणि आर्थिक पिळवणकीला बळी पडलेल्या ग्राहकाला दाद मागणे आता सोपे झाले आहे. जागतिकीकरणानंतर जग एका मोठ्या जागतिक बाजारपेठेत  रुपांतरित होत आहे. ज्या बाजारपेठेत सर्व सामान्य माणसाला देखील मनाजोगते खरेदी करता येणे शक्य आहे. ही जागतिक बाजारपेठ देखील झपाट्याने विकसित होत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यातच ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ग्राहकांकडे आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागले आहेत.   

तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या इकोसिस्टममध्ये उत्पादने आणि सेवांचे मार्केटिंग, विक्री आणि वितरण करण्याच्या पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होत असताना, भारताने २०१९ मध्ये प्रगत आवृत्तीचा आरंभ करण्यासाठी आपला तीन दशके जुना ग्राहक संरक्षण कायदा रद्द केला. ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) 20 जुलै 2020 पासून लागू झाला.  नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा नवीन 2019 च्या कायद्याने घेतली. नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक नवे अधिकार मिळाले.

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील तरतुदी  

मागील कायद्यातील काही तरतुदी कायम ठेवताना, २०१९ कायद्याने नवीन तरतुदी आणल्या ज्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रमाणात संरक्षण देण्यासाठी विद्यमान नियमांना कठोर  करतात. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत नवीन तरतुदींमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत.

ई-कॉमर्सचा समावेश, थेट विक्री याबरोबरच  केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ची स्थापना करण्यात आली. यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी कठोर नियम, उत्पादन दायित्वासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. आर्थिक अधिकारक्षेत्रातील बदल, विवादाचे निराकरण करण्यात अधिक सुलभता आली आहे. अयोग्य व्यापार व्यवहाराच्या कलमात बदल करुन तो अधिक कायद्याच्या कक्षेत व्यापक करण्यात आला. अयोग्य करार, तसेच मध्यस्थीद्वारे पर्यायी विवाद निराकरण करण्यासाठी तरतुद करण्यात आली.

ग्राहकांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांचा योग्य व जाणीवपूर्वक वापर करताना ग्राहकांनी काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत. ते ग्राहकाला दिलेल्या वरील अधिकारामुळे ग्राहक आणि सेवा देणारे यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली.  ग्राहकांना न्याय व हक्क देण्याच्या दृष्टीने शासनाने  ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आणून फसवणूक झालेल्या ग्राहकांना एक सुरक्षेचे कवच दिले.  ग्राहकांना न्याय मिळणे सोपे व सुलभ होण्याच्या दृष्टीने नवीन कायद्यामध्ये अनेक तरतुदी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्राहकांनी कायद्यांचा आधारे न्याय मिळवणे, हा जसा त्यांचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे कोणताही व्यवहार करतांना तो अत्यंत सतर्कतेने आणि सावधपणे करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. त्यासाठी ग्राहकांनी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

1.फसव्या जाहिराती आणि दिखाव्याला भुलून कोणतीही वस्तू अथवा सेवा खरेदी करू नका.

  1. वस्तूच्या वेष्टनावरील छापील मुल्यापेक्षा (MRP)अधिक रक्कम देऊ नका.
  2. वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे देयक (बिल) मागून घ्या.
  3. रकमेची गुंतवणूक मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवताना जास्तीच्या व्याजदराला बळी पडू नका.
  4. कोणतीही विमा पॉलिसी घेण्यापूर्वी पॉलिसीचा कालावधी आणि प्रीमियम भरण्याचा कार्यकाळ तपासून पहा.
  5. ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगा.

2019 च्या ग्राहक हक्क्‍ संरक्षण कायद्याने ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव अधिक व्यापक स्वरुपात करून देण्यात आली आहे. ज्या प्रमाणे ग्राहकांनी चोखंदळपणे एखादी वस्तु खरेदी करतो. त्याचप्रमाणे कोणतेही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करताना तसेच व्यवहार करतांना जागरुक आणि डोळसपणे आपली ग्राहक राजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने ग्राहक राजा होऊ शकतो.

डॉ. मीरा ज्ञानदेव ढास (माहिती अधिकारी),जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद

                                                                               

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here