मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या. डॉ. निलम गो-हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाकडून भाई गिरकर हे उमेदवार होते. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर डॉ. गो-हे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकमतानं नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपानं सभात्याग केला.
गुरूवारी न्यायालय देणार निकाल
निवडणुकीपूर्वी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसंच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं. तसंच यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.
उच्च न्यायालयानं समन्स दिलं तर उत्तर देऊ
न्यायालयानं आपल्याला बोलावलं नाही. न्यायालयानं निकालाबद्दल सांगितलं नाही. म्हणून हे मान्य करता येणार नाही. निवडणुकीचा प्रश्न नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. उच्च न्यायालयानं समन्स दिलं तर त्यावर आपण उत्तर देऊ,” असं सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
नीलम गोऱ्हे यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलम गोऱ्हे या स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना शुभेच्छा देताना म्हणाले.