“राहुल नार्वेकरांचे लंडनमधून प्रवचन, १६ आमदार अपात्र..; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. “राहुल नार्वेकर शिवसेनेचे उरलेले १६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत”, असा आरोप राऊतांनी केला. तसेच पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची टीकाही राऊतांनी केली. ते रविवारी (१४ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

sanjay-raut-criticize-rahul-narvekar-over-implementation-of-supreme-court-direction-news-update-today
sanjay-raut-criticize-rahul-narvekar-over-implementation-of-supreme-court-direction-news-update-today

मुंबई:शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. “राहुल नार्वेकर शिवसेनेचे उरलेले १६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत”, असा आरोप राऊतांनी केला. तसेच पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची टीकाही राऊतांनी केली. ते रविवारी (१४ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे इतर राज्यांचे मुख्यमंत्री अशी सगळी आर्मी लावूनही कर्नाटकच्या जनतेने त्यांचा पराभव केला. म्हणजे सामान्य जनता हुकुमशाहीचा पराभव करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आलं. १९७८ मध्ये इंदिरा गांधींच्या बाबतीत जे झालं होतं त्याची सुरुवात पुन्हा एकदा कर्नाटकपासून सुरू झाली आहे.”

 “महाराष्ट्र तर भाजपाने लुटलेलं राज्य आहे”

“‘कर्नाटक तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं’ असं म्हणण्यापेक्षा ‘कर्नाटक तो झाकी हैं, पुरा देश अभी बाकी हैं’ असं म्हटलं पाहिजे. आम्ही २०२४ ची तयारी करतो आहे. महाराष्ट्र तर भाजपाने लुटलेलं राज्य आहे. ही लूट आहे, ही नैतिकता नाही. त्यामुळे लुटीचं राज्य भाजपाकडे फार टिकणार नाही,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

 “पक्षांतराला उत्तेजन देणं हा राहुल नार्वेकरांचा व्यवसाय”

संजय राऊत पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडनमधून मुलाखत देऊन शिवसेनेचे उरलेले १६ आमदार कसे अपात्र होतील यावर प्रवचने देत आहेत. नार्वेकरांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणं हा राहुल नार्वेकरांचा व्यवसाय आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन करा असं सांगतो आहे. अन्यथा महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला दाखवावं लागेल.”

“भुलथापा बंद करा, नार्वेकर खरंच वकील असतील, तर…”

“ही धमकी नाही. परत म्हणतील धमकी दिली. आम्ही कायद्याचं पालन करा असं सांगतो आहे. पक्षांतराला उत्तेजन देऊन ते लोकशाही आणि स्वातंत्र्याची हत्या करत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही. शिवसेनेचे १६ आमदारही आमच्या अखत्यारित येतील आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, अशा सुरू असलेल्या भुलथापा बंद करा. नार्वेकर खरंच वकील असतील, तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

“तुम्ही कोण असे लॉर्ड फॉकलंड लागून गेले आहात”

“नार्वेकर म्हणत आहेत की, आम्हाला निर्णय घ्यायला अमर्याद वेळ आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेत कायद्याच्या चौकटीत राहून न्याय द्यावा लागतो. तसेच त्याला वेळेचं बंधन असतं. तुम्ही कोण असे लॉर्ड फॉकलंड लागून गेले आहात. इथं ब्रिटिशांचा कायदा चालत नाही. हे भारतीय संविधान आहे हे लक्षात घ्यावं,” असंही राऊतांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here