
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला आज पासून सुरुवात झाली आहे. लोकशाही पध्दतीने आणि शांततेत होत असलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सर्व समाजातील नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यासह एमआयएम पक्षानेही आपला पाठिंबा दर्शवुन आंदोलनात सहभागी झाला आहे.
आंदोलनात खासदार इम्तियाज जलील यांच्या सोबत एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. हा आंदोलन कोणत्याही जाती, धर्म, पक्ष, संघटनांचा नसून हा औरंगाबादकरांच्या अस्मियतेचा प्रश्न आहे. याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्ष व संघटनांनी करु नये तसेच शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनात कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होतील असे कृत्य न करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
आंदोलनास वाढता पाठिंबा पाहता सहभागी होणारे विविध संघटना व पक्षाच्या नेत्यांनी कोणत्याही महापुरुषांबद्दल अपशब्द न वापरता अथवा कोणाचेही धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य न करता संयमाने व मुद्देसुद भाष्य करण्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
आंदोलन लोकशाही मार्गाने, शांततेने आणि औरंगाबादकरांच्या सहकार्याने सुरु असल्याने सोशल मिडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणत्याही महापुरुषाबद्दल अपशब्द अथवा धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कोणत्याही प्रकारचे विधान किंवा मॅसेजेस पोस्ट न करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी युवकांना केले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाईक रॅली न काढण्याचे तसेच आंदोलन स्थळी कोणीही कोणत्याही पक्षाचे अथवा संघटनांचे झेंडे, फोटो किंवा बॅनर आणू नये असे सुध्दा आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.