मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील असं शरद पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
“धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेसनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतीलअसा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी हायकोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडलं असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
“त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझ कर्तव्य आहे. त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकलं जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ,” अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.