नवी दिल्ली : भारतरत्न, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रणव मुखर्जींवर दिल्लीत आज मंगळवारी (१ सप्टेंबर) दुपारी २.३० वाजता लोधी स्मशान घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पश्चिम बंगालमधील मूळ गावाऐवजी राजधानी दिल्लीतच मुखर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रणव मुखर्जींचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता दिल्लीत राजाजी मार्ग येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. सकाळी ९ वाजेपासून मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत सामान्यांना श्रद्धांजली वाहता येईल.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी दिल्लीत निधन झाले. प्रणवदांवर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते ८४ वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी हे देशाचे १३वे राष्ट्रपती होते. बऱ्याच काळपासून ते आजारी होते. त्यांचा करोना चाचणी रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.
मुखर्जींच्या निधनावर मान्यवरांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक नेत्यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत त्यांची छायाचित्रे ट्विट केली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.