“मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा…”, शिवसेनेचे भाजपावर टीकेचे आसूड

shivsena-attacks-pm-narendra-modi-and-bjp-over-bhagatsingh-koshyari-trivedi-and-lodha-chhatrapati-shivaji-maharaj-statement-news-update
shivsena-attacks-pm-narendra-modi-and-bjp-over-bhagatsingh-koshyari-trivedi-and-lodha-chhatrapati-shivaji-maharaj-statement-news-update

मुंबई:गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी आहे. राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ‘शंभर तोंडांच्या रावणा’शी केली. त्यानंतर मोदी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात गदारोळ सुरु आहे. यावरून विरोधकांकडून सातत्याने भाजपावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. पण, भाजपाने राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी आणि लोढा यांच्या विधानांवरून बचावात्मक भूमिका घेतली आहे. यावरून शिवसेनेने ‘सामना’तून भाजपावर टीकेचे आसूड ओढले आहेत.

“महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! राधाकृष्ण विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठ्यांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयनराजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’ हा निर्लजपणाच आहे!,” असे शिवसेनेने म्हटलं आहे.

“भाजपा हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजपा नेमके हेच करीत आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत. ज्यांनी उसळून तलवार काढली, त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत,” असे शिवसेनेने सांगितलं आहे.

“छत्रपतींचा अपमान राज्यपाल कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्याचे पर्यटनमंत्री लोढा यांनी केला. लोढा हे बिल्डर आहेत व त्यांनी बांधलेल्या गृहसंकुलात मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नाकारला गेल्याचे प्रकरण गाजले होते. आताही तीच परिस्थिती आहे. इतिहास काळात लोढा हे बिल्डर असते व छत्रपतींच्या मावळ्यांनी, सरदारांनी त्यांच्या गृहसंकुलात प्रवेश केला असता तर त्यांची काय भूमिका असती? कारण मावळे हे तसे मांसाहारीच होते व आहेत. लोढा यांनी मावळ्यांनाही ते मांसाहारी आहेत म्हणून बंदीच घातली असती. त्यामुळे याबाबतीतही धोरण ठरले पाहिजे. छत्रपतींवर अद्वातद्वा बोलण्यातच मंत्र्यांचा वेळ चालला आहे,” असे म्हणत शिवसेनेने लोढा यांच्यावरही टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here