औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 911वर पोहोचली आहे. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी औरंगाबादच्या गोगाबाबा टेकडीवर हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. यावेळी विनामस्क फिरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विनामास्क वॉक करणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली.
काही दिवसांपूर्वीच रोजाबाग परिसरात कट्ट्यावर नागरिकांची मोठी गर्दी होत होती. तसेच पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर कट्ट्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु गोगाबाबा टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी दररोज गर्दी होत आहे. मास्क न वापरताच अनेकजण मॉर्निंग वॉक करत होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून ट्रेकिंग आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांची संख्या 22 हजारापुढे
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी 29 ऑगस्ट 313 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 911 झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 684 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.