Mumbai local train l लोकल सर्वांसाठी सुरु होणार, महाविकास आघाडी सरकारचे संकेत

पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करुन दिले संकेत

Local train will start for everyone
Local train will start for everyone

मुंबई l मुंबई लोकलमधून Mumbai local train सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ट्विटरवर प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकलमधून Mumbai local train प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र इतर प्रवाचशांचे प्रचंड हाल होत आहे. 

एका प्रवाशाने ट्विट करत, “ महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे” अशी खंत व्यक्त केली होती.

यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ” असं सांगितलं. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा l Bihar Elections 2020 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, आज ७१ जागांसाठी मतदान

याआधी विजय वडेट्टीवार यांनी महानगर प्रदेशातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली होती.

विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यावेळी उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांना खुली करण्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी करोनाच्या परिस्थितीत टप्प्याटप्प्याने लोकांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.