मुंबई: प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
“सुशातसिंह राजपूत प्रकरणापासून एक चित्र निर्माण केले आहे महाराष्ट्रात फक्त गांजा, अफू, चरस याचेंच पीक निघते. मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?,” असे संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
“याविषयी बोलताना भाजपाच्या लोकांना वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणं आमच्या गळ्यात मारले आहे ते काढले पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्र पोलिसांचे खाते ड्रग्जविरोधात काम करत आहे. त्यासाठी केंद्राने इथे येऊन काम करण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज पकडायचे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जणूकाही फार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत आहेत असे दाखवायचे. मुंबईतली सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवायची आहे यासाठी हे धंदे सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या असतात राजकीय पक्षाच्या नसतात. भाजपाचे लोक केंद्रीय यंत्रणा त्यांच्या नोकर आहेत अशा तऱ्हेने कारभार करत आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एनसीबीने आरोप फेटाळून लावले आहेत असे म्हटल्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “पुरावे आहेत का समोर? चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही. खोटे पंच, पंचनामे, भाजपाशी संबधित पंच आहेत. त्यातील एकानेच पैशाचे व्यवहार कसे झाले याची माहिती दिली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
धागेदोरे दिल्लीपर्यंत
याप्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं ते म्हणाले.
करा ना सीबीआय चौकशी, मी दहा व्हिडीओ देतो
भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, असं आव्हानच त्यांनी दिलं.
ते भाजपच सांगेल
केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.
साईलच्या धाडसाचं कौतुक
साईल हा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा केली पाहिजे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी बोललो. राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्रं रचलं गेलं. त्याला काही अधिकाऱ्याने हे बिंग फोडलं. पण या मुलाने बिंग फोडलं. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले, असंही त्यांनी सांगितलं.