विजय वडेट्टीवार यांचं कौतुक करताना सचिन सावंतांचा अजित पवारांना टोला

While praising Vijay Wadettiwar, Sachin Sawant's taunt to Ajit Pawar news update today
While praising Vijay Wadettiwar, Sachin Sawant's taunt to Ajit Pawar news update today

मुंबई: राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. “दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांचे हार्दिक अभिनंदन! विजयभाऊ विरोधीपक्षनेते असताना मविआ सरकार आले. महाराष्ट्राला सत्तेत सामिल होणारा नव्हे तर सत्ता खेचून आणणारा विरोधीपक्षनेता मिळाला आहे. आता खऱ्या अर्थाने जनहितार्थ सरकारला धारेवर धरले जाईल”, अशा शब्दांत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. 

१ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्या नावा नियुक्तीबाबत पत्र लिहिले होते. काँग्रेसकडून आलेली ही शिफारस राहुल नार्वेकर यांनी मान्य केली असून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करत त्यांचे अभिनंदन केलं. आता त्यांच्यावर राज्यातील अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही विजय वडेट्टीवारांबाबत ट्वीट केलं आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राज्यात राजकीय उलथापालथ झाली. राज्याच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार सत्तेत सामिल झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले. राज्यात महाविकास आघाडी विरोधी बाकावर आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे तुलनेने सर्वाधिक सदस्य संख्याबळ होते, त्यामुळे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे होते. परंतु, अजित पवारांनी महाविकास आघाडीतील पाठिंबा काढून घेत पक्षात फूट पाडली. त्यामुळे त्यांच्यासह पक्षातील अनेक आमदार गेले. परिणामी महाविकास आघाडीत शरद पवारांच्या गटाची विधानसभेतील सदस्य संख्या घटली. त्यामुळे विरोधी पक्षासाठी आता काँग्रेसकडे सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने हे पद काँग्रेसकडे गेले आहे.

नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांसह अनेक नेत्यांची नावे विरोधी पक्षनेते पदासाठी पुढे येत होती. परंतु, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यास दिरंगाई झाली. अखेर, १ ऑगस्ट रोजी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर, आज राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. त्यानुसार, त्यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची जागा स्वीकारली. माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांना विरोधी बाकावर विराजमान केले.

पावसाळी अधिवेशाचे सुरुवातीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवाय गेले. तर, अधिवेशन संपायला आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार किती आक्रमक होतात हे पाहावं लागणार आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here