औरंगाबाद : तरुणांनो निवडणूका लढवा; राजकारणात सक्रिय व्हा असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी केले. हडको येथील राष्ट्रवादी भवनात शरद युवा संवाद यात्रे निमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महेबूब शेख यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सध्या शरद युवा संवाद यात्रा सुरु आहे. युवा यात्रेचा पाच टप्पा सध्या राज्यात सुरु आहे. मंगळवारी दुपारी शहरात शरद युवा संवाद यात्रेनिमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन शहराध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे व कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी केले होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवाव्यात असे आवाहन केले आहे. आज राजकारणात तरुणांची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही महेबूब शेख यांनी सांगितले.
शरद पवार यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत. काही मंडळी विचारतात शरद पवारांनी युवकांसाठी काय केले त्यांना एकच सांगतो ज्या पुण्याच्या आयटी कंपनीमध्ये तुम्ही काम करता ती आयटी हब कंपनी शरद पवार यांनी उभी केली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. सत्तेची परवा न करता मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे.
डॉ. मयूर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचा जोर वाढला…
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व वॉर्डांमध्ये शरद युवा संवाद यात्रेनिमित्त बैठकांचा सपाटा सुरु आहे. विशेष म्हणजे कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत राष्ट्रवादीचे विचार पोहोचविण्याचे काम सुरु आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एकूण चित्र आहे. यामुळे राष्ट्रवादीची चांगली ताकद वाढत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
फोक्सकोन-वेदांता प्रकल्प देखील भाजप सरकारने गुजरातच्या घशात घालण्याचे काम केले. याकरीता युवकांनी पुढाकार घेऊन याविरोधात आवाज उठवून तो प्रकल्प महाराष्ट्रात कसा आणता येईल याचे नियोजन केले पाहिजे. तसेच भाजप सरकारने औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प, कॉलेज, विधी विद्यापीठ हे सर्व नागपूरला पळवण्याचे काम केले असा हल्लाबोल महेबूब शेख यांनी यावेळी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार कैलास पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. सुनील मगरे,शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन मुल्ला, प्रदेश सरचिटणीस मुस्ताक अहमद, रोहित देशमुख, पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.