आदित्य ठाकरेंनी आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’केल्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

shivsena-rebel-aurangabad-west-mla-sanjay-shirsat-on-aditya-thackeray-matoshree-news-update-today
shivsena-rebel-aurangabad-west-mla-sanjay-shirsat-on-aditya-thackeray-matoshree-news-update-today

औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान, ते बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नाशिक, मनमाडनंतर आता आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधूनदेखील बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत आहेत. त्यामुळे आता बंडखोर आमदार देखील आक्रमक होताना दिसत आहेत.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही मातोश्रीविरोधात बोलणार नाही, असं ठरवलं आहे. पण ते एका मर्यादेपर्यंत असतं. त्यामुळे हे जेव्हा जास्त होईल, तेव्हा एखाद्यानं आपल्याबद्दल चुकीचं बोलू नये, याची काळजी त्यांनी (आदित्य ठाकरे) घ्यावी, असं माझं मत आहे” असं प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलं आहे.

पुढे ते म्हणाले, “आदित्यसाहेब दौरा करत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. हे दौरे पूर्वीही व्हायला पाहिजे होते. त्यांनी शिवसैनिकांना, आमदारांना भेटायला हवं होतं. त्यांची मतं ऐकून घ्यायला पाहिजे होती. आदित्य ठाकरे आता असा दौरा करत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे.

मातोश्रीविरोधात बोलायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. मग ते उद्धवसाहेब असो वा आदित्य साहेब असो, त्यांच्याविरोधात आम्ही बोलणार नाही. पण हे सर्व एका मर्यादेपर्यंत असतं. हे जेव्हा जास्त होईल, तेव्हा एखाद्यानं आपल्याबद्दल चुकीचं बोलू नये, याची काळजी त्यांनी घ्यावी” असंही शिरसाट म्हणाले.

आदित्य ठाकरेंकडून सातत्याने बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे, या विधानाबाबत विचारला असता शिरसाट म्हणाले, “ते विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पण सर्वांनी दुकानातून वस्तू खरेदी करावी, तशी आमदारकी किंवा खासदारकी खरेदी केली आहे. त्यांनी कुठेही मेहनत केली नाही, असं समजणं चुकीचं आहे. शिवसेनेच्या वाढीमध्ये प्रत्येकाचं योगदान होतं आणि आहे. त्यामुळे एखाद्याला गद्दार म्हणणं त्यांना शोभा देत नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here