औरंगाबादच्या नारेगावातील ‘त्या’ युवकाची आत्महत्या नव्हे हत्याच!

शवविच्छेदनातून झाले स्पष्ट, मृतकाच्या नातेवाईकांचा पोलिसांनी नोंदवला जबाब

"That" youth in Aurangabad's Naregaon is not suicide but murder!

औरंगाबाद: नातेवाइकांनी तरुणाची हत्या करून, त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा आणि त्यानंतर घाईगडबडीत अंत्यसंस्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाल्याची तक्रार या तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर पाच दिवसांनी मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आला आणि तपासाला सुरुवात करण्यात आली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीमध्ये मृतदेहावर सहा ठिकाणी वार असून तरुणाची हत्याच झाल्याचा अहवाल शवविच्छेदनातून समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घनसावंगी पोलिसांनी आज शुक्रवारी मृतकांच्या नातेवाईंकांचा नारेगावमध्ये जबाब घेतला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

सालेह फरहान हिलाबी उर्फ शहजाद (वय १९, रा. नारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील फरहान सालेह हिलाबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेह मावशीच्या गावाला म्हणजे घनसावंगी येथील देवनगर येथे गेला होता. तेथे चार दिवस राहिल्यानंतर, वासेद याफई या नातेवाइकाने १७ नोव्हेंबर रोजी त्यांना फोन केला आणि सालेहने आत्महत्या केल्याचे सांगितले. या फोनमुळे फरहान यांना धक्का बसला. त्यानंतर आनस मोईद याफई, सालेह मोईद याफई, मोईद याफई यांनी शहजाद याचे पार्थिव नारेगावपर्यंत आणले.

आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगून या नातेवाइकांनी गडबड केली आणि पहाटे चार वाजेपर्यंत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दोन दिवसांनी फरहान यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करून, गुरुवारी गंजे शहिदा कब्रस्तान येथे दफन केलेला मृतदेह कबरीतून बाहेर काढला.

मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेच्यावेळी तहसीलदार, घनसावंगीचे पोलिस, न्यायवैद्यक विभागाचे पथक; तसेच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेले. या ठिकाणी अहवालात मृत युवकावर सहा वार झाल्याची माहिती समोर आली आहे. आज शुक्रवारी मृतकाच्या नातेवाईकांचे पोलिसांनी नारेगावात जबाब घेतले. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर  संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here