औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामिण जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब तरमाळे यांच्यावर विरोधकांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथे घडली. या प्रकरणी सात आरोपींविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत अशोक नागे, राजु बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुड जळगाव, पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भाऊसाहेब यांच्या आई निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. चांगल्या मताधिक्याने त्या निवडून आल्या. मात्र, हाच निवडणुकीचा राग विरोधकांच्या मनात होता. शनिवारी रात्री भाऊसाहेब हे गावात आले असता अनिकेत नागे याने त्यांच्यांशी वाद घातला व स्वतः जवळील धारदार चाकूने त्यांच्या मानेवर वार केला.
घाव जोरात बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर गावात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच बिडकीन पोलीस ठाण्याच्या पथकाने गावात धाव घेतली. जखमी असलेल्या भाऊसाहेब यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या एका खासगी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी सात आरोपींविरोधात विविध कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.