‘’माझ्या मागे ईडी लावली तर, मी सीडी लावेल’’;एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर भाजपाला दिला इशारा

eknath-khadse-ncp-leader-car-accident-after-tyre-burst
eknath-khadse-ncp-leader-car-accident-after-tyre-burst

मुंबई l माझ्या मागे ईडी लावली तर, मी सीडी लावेल असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळ्यानंतर भाजपाला दिला. खडसे यांनी भाजपामध्ये कसा छळ करण्यात आला याची जंत्री वाचून दाखवली.

गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज शुक्रवार (23 ऑक्टोबर) अधिकृत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले, मी लेचापेचा नेता नाही. नाथाभाऊनं सेवा करण्यात हयात घातली. मला चार वर्ष घरी बसवलं. माझा छळ करण्यात आला. आज डोक्यावरचं ओझं हलकं झालं. मला अनेक पक्षांनी ऑफर दिली. मला दिल्लीहून फोन आला माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मी जी तक्रार केली होती. माझा जो छळ करण्यात आलं त्याचं कायं असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

खडसे म्हणाले, माझ्यावर भूखंडाचे खोटे आरोप लावण्यात आले. कुणाचे भूखंड कोणत्या ठिकाणी आहे ते आता मी दाखवणार आहे असा इशाराही खडसे यांनी दिला आहे. विनयभंगाचे खोटे आरोप लावण्यात आले. मी पाठीत खंजीर खुपसला नाही. 

एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी मुलगी रोहिणी खडसे या सर्व समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले होते.

खडसे काय म्हणाले

“कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं.

दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.

वाचा l Eknath khadse l अखेर एकनाथ खडसेंनी हातात घडयाळ बांधलं

पुढे ते म्हणाले होते की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली… त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं.

मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.

“मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकाप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट,” असं खडसेंनी म्हटलं. “भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.