संभाजीनगरात एअर वॉल्व्हच्या ८० ठिकाणी जलवाहिनीला धोका

विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त,एमजीपीच्या अधिका-यांनी केली संयुक्त पाहणी

Sambhajinagarat air valve water pipe leakage at 80 places
Sambhajinagarat air valve water pipe leakage at 80 places

छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगरः शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पैठण रोडवर २५०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता केल्यामुळे (कॅरेज वे) पेच निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. ४) विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत पाइपलाइनची पाहणी केली. त्यात एअर वॉल्व्हच्या ८० ठिकाणी जलवाहिनीला धोका असल्याचे समोर आले. त्यानंतर  कंत्राटदार, एमजीपीच्या अधिका-यांना  विभागीय आयुक्त, मनपा प्रशासकांची तंबी दिली. त्यानंतर एमजीपी व न्हाईच्या संयुक्त अहवालानंतर तोडगा काढला जाईल, असे दिलीप गावडे यांनी सांगितले.

शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या योजनेतील पैठण येथील नाथसागर ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचे ३९ किलोमीटर पैकी साडेचार ते पाच किलोमीटर अंतराचे काम शिल्लक आहे. ही पाइपलाइन टाकताना पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. त्यात पाइपलाइनवरून रस्ता करण्यात आला आहे. सुमारे २० किलोमीटर अंतराचा कॅरेज वे चा प्रश्‍न असल्याचे सांगितले जात होते. या रस्त्यावरून जड वाहतुकीला परवानगी दिली आणि भविष्यात पाइपलाइन फुटल्यास मोठा अनर्थ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याने रस्त्यावरून जड वाहतुकीला परवानगी मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. पाइपलाइन बदलणे शक्य नसल्यामुळे एका बाजूने रस्ता रुदींकरण करण्याचा एकमेव मार्ग सध्या शिल्लक आहे, त्यासाठी मात्र भूसंपादन करावे लागेल आणि शासनाकडून त्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करून घ्यावा लागणार आहे. 

या सर्व शक्यतांच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राजेंद्र इंगोले, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उपअभियंता किरण पाटी, महापालिकेचे विशेष प्रकल्प अधिकारी एम. बी. काझी, कार्यकारी अभियंता के. एम. फालक, पीएमसीचे समीर जोशी यांना सोबत घेऊन सकाळी ८.३० ते सायंकाळी ३.३० वाजेपर्यंत जॅकवेलपासून नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाहणी केली.  यावेळी मनीषा पलांडे यांनी सांगितले की, मार्चपर्यंत जॅकवेलचे काम प्रगतिपथावर असून, हे काम मार्च अखेरीस काम पूर्ण होईल. 

पैठण रस्त्यावर ८० एअर वॉल्व्ह तर आठ बटर फ्लाय वॉल्व्ह आहेत. यातील ४० ठिकाणी एअर वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. हे वॉल्व्ह बसविताना जुगाड करण्यात आले आहे. काही ठिकाणी वॉल्व्ह हे कॅरेज वे मध्ये आहेत तर काही ठिकाणी साइड ड्रेनेमध्ये वॉल्व्ह येत आहेत. त्यामुळे हे वॉल्व्ह रस्त्याच्या बाहेर काढताना वाकडे करण्यात आले आहेत. त्यावर पलांडे यांच्यासह काझी यांनी आक्षेप घेतला. विभागीय आयुक्त, महापालिका प्रशासकांनी अशा प्रकारे एअर वॉल्व्ह कुठे वापरले आहेत का, असा प्रश्‍न पीएमसीचे जोशी यांनी केला. त्यांनी अशा प्रकारे पाइप काढल्यामुळे धोका होण्याची शक्यता नाही, यापूर्वी अशा प्रकारे वापर झालेला आहे का, याचा शोध घेऊन कळवितो, असे उत्तर दिले.

अधिकाऱ्यांसमोरच दोन विभागात बेबनाव

पाहणी दरम्यान एका पुलाखाली मुख्य पाइपलाइनचा पाइप वर आल्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असे महापालिका व जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पाटील यांनी हे दाखवून तुम्ही नेमके काय साध्य करू इच्छिता असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना केला. आम्ही सर्व यांना पूर्व कल्पना देऊनच काम केले आहे, असा दावा पाटील यांनी केला.

पाइपलाइन टाकण्यासाठी अडथळे

मुख्य पाइपलाइनवरील कॅरेज वे चा विषय वगळता पाणी योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस नव्या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाणी शहरापर्यंत येईल. कॅरेज वे च्या विषयावर अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तोडगा काढला जाईल. काही ठिकाण पाइपलाइन टाकण्यासाठी अडथळे आहेत. या कामाला देखील गती दिली जाईल.

-दिलीप गावडे, विभागीय आयुक्त

गुणवत्तेत कुठेही तडजोड नाही

पैठण रोडवर ५० ते ६० स्पॉट आहेत, ज्याठिकाणी जलवाहिनीला अडथळे आहेत. त्यावर एमजीपी, न्हाई, पीएमसी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एकत्र बसून तोडगा काढतील, यात चूक कोणाची झाली यापेक्षा मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र गुणवत्तेत कुठेही तडजोड केली जाणार नाही.

-जी. श्रीकांत प्रशासक महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here