लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का?; सचिन सावंतांचा सवाल

bjp-only-benefits-from-popular-front-of-india-sachin-sawants-statement-news-update-today
bjp-only-benefits-from-popular-front-of-india-sachin-sawants-statement-news-update-today

मुंबई : अमरावती येथील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा शोध लागल्यानंतर कथित ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान या अगोदर या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांकडे चौकशी केली असता, त्यांचा फोन रेकॉर्डिंग करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत पोलिसांशी हुज्जत घातल्याचे समोर आले. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उद्देशून प्रश्न उपस्थित केले आहेत.

सन्माननीय फडणवीस साहेब,

१.पोलिसांनी मोबाईलवर फोन रेकॉर्डिंग अॅप ठेवायचा नाही असा पोलीस मॅन्युअलमध्ये नियम आहे का? यावर प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे.
२. ‘लव्ह जिहाद’ नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का? मग कारवाई का नाही?” असं ट्वीटद्वारे सचिन सावंत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं आहे.

दरम्यान, ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणात अल्पसंख्याक समुदायातील एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण असून या युवतीला पळवून नेल्याचा आरोप बुधवारी खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केल्याने राजापेठ पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वास्तव समोर आल्यावर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा बागुलबुवा उभा करण्यात आला, शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली.

या तरुणीने मंगळवारी दुपारी बँकेतून ३ हजार रुपये काढले. नंतर ती रेल्वेने पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या युवतीला सातारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने सातारा येथून ताब्यात घेण्यात आले. ती एकटीच प्रवासात होती. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते. प्राथमिक चौकशीदरम्यान तिने आपण रागाच्या भरात घरून निघाल्याचे सातारा पोलिसांना सांगितले आहे, पण ती अमरावतीत आल्यावरच प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here