बाबरी मशीद प्रकरणी आज फैसला; आडवाणी, उमा भारती मुख्य आरोपी

lucknow-special-cbi court-to-pronouce-verdict-on-babri-case-
बाबरी विध्वंस प्रकरण आज फैसला lucknow-special-cbi court-to-pronouce-verdict-on-babri-case-

लखनऊ :   आयोध्येतील बाबरी मशीद २८ वर्षांपूर्वी १९९२ मध्ये पाडल्याप्रकरणी लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालय आज बुधवारी निकाल देणार आहे. या खटल्यात भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात एकूण ३२ आरोपी असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

६ डिसेंबर १९९२ रोजी आयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल विशेष सीबीआय न्यायालय आधी ३१ ऑगस्ट रोजीच देणार होते. परंतु काही कारणास्तव त्या दिवशी हा निकाल येऊ शकला नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी ३० सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवून दिली.

या प्रकरणी सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीआयडी आणि एलआययूची पथके साध्या वेशात तैनात करण्यात आली आहेत. लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाच्या बाहेर सुमारे दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय उत्तर प्रदेशातील २५ संवेदनशील जिल्ह्यातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

 प्राचीन राम जन्मभूमीच्या जागेवरच ही मशीद बांधण्यात आल्याचा दावा करत ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी आयोध्यातील ही मशीद पाडली होती. ही मशीद पाडल्यानंतर आयोध्येत दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यातील एक गुन्हा वादग्रस्त वास्तू पाडण्याचा कट रचल्याचा आहे. तर दुसरा गुन्हा ही वास्तू पाडण्यासाठी जमावाला चिथावणी दिल्याशी संबंधित आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा खटला दोन वेगवेगळ्या न्यायालयात चालला. कट रचल्याचा खटला लखनऊच्या न्यायालयात तर जमावाला चिथावणी दिल्याचा खटला रायबरेली न्यायालयात चालला.

सीबीआयने १९९३ मध्ये ४९ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यातील १७ आरोपींचा सुनावणी सुरू असतानाच मृत्यू झाला. रायबरेलीच्या खटल्यात २००५ मध्ये तर लखनऊच्या खटल्यात २०१० मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही खटले एकत्रित चालवून दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. तेव्हा उच्च न्यायालयाने आधी दोषमुक्त केलेल्या १३ लोकांविरुद्धही पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

 दरम्यान, आज न्यायालयाचा निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह हे न्यायालयात हजर राहणार नाहीत. आडवाणी आणि जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here